सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ सरी आठवांच्या… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
(वृत्त~दिंडी)
नभी दाटी ही गर्दघन ढगांची
तशी गर्दी का स्मृतींच्या थरांची ॥१॥
पावसाच्या ह्या सरी मोद देती
भिजत असताना आठवणी येती ॥२॥
विसरते मी स्थळ काळ बंधनांना
पुन्हा रमते मी जागवित स्मृतींना॥३॥
आठवे मज ते स्वैर बाल्य सारे
माय बापाचे लाड कोड प्यारे ॥४॥
दिले संस्कारा किती मला त्यांनी
उभे केले मज जीवनी सुखानी ॥५॥
भेट होता त्या राजकुमाराची
गंध दरवळला वाट यौवनाची ॥६॥
प्रीत सुमने ती उधळली सुखाने
बकुळ पुष्पासम जाहलो मनाने ॥७॥
चिंब भिजलो की प्रेम पावसाने
हरित झालो ना प्रीति भाषणाने ॥८॥
दिवस गेले ते हवेसम उडाले
नाटकाचे हे अंक सर्व सरले ॥९॥
चित्त आता मम हरि नामस्मरणी
समज आली ही प्रभू तुझी करणी ॥१०॥
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
खूप छान