श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ जादूचा पेला… ☆
दारीद्र्याला चटके देतच एक दागिना केला
आणि फाटक्या आयुष्याचा उसवत गेलो शेला
जाता येता फुंकर मारी तो सुमनांच्या गाली
वात आणला या वाऱ्याने चावट आहे मेला
शिशिर नाहीच कधी पाहिला नित्य घाततो पाणी
बारा महिने वसंत आहे कसा घरी नटलेला
रोज रात्रिला प्राशन करतो तरी पुन्हा भरलेला
आंदणात मज होय मिळाला हा जादूचा पेला
नीती नाती विसरुन जातो सत्तेसाठी सारी
क्षणात टोपी नवी घालतो स्वार्थासाठी चेला
मुखडा ठेवुन बाजूला ती समोर आली होती
खरा चेहरा समोर येता तडा जाय काचेला
आभाळाला हात टेकले शस्त्रे केली गोळा
बसू लागले धक्के आहे आता मानवतेला
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈