कवितेचा उत्सव
☆ साजरा श्रावण ☘️ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
आभाळाच्या मंडपात
मेघ गातसे मल्हार
थेंबा थेंबानी ओविले
शुभ्र मौक्तिकांचे हार….💦💦
हळदुल्या उन्हाच्या या
पावसात येरझारा
ऊनं पावसाचा खेळ
असा श्रावण साजरा..🌦️
ओल्या चिंब पावसाला
येई प्राजक्ताचा गंध
जाई -जुई -चमेलीही
झुलतात मंद मंद…🌼
सोनसळी किरणांनी.
इंद्रधनु रेखाटले
नभं गळता गळता
मनं माझे आभाळले…🌈
आठवांच्या शिंपल्यात
झुले माहेरचा झुला
त्या आनंद क्षणांचा
असे पाऊस आगळा…😢
© शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈