श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ श्रावण… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(अष्टाक्षरी)
सारे आषाढ अंकुर
रान श्रावणी हिरवे
धोधो धोधो संगीताची
धून मंद आता उरे !
क्षणी नभ अभ्रांकित
क्षणी होई निळे निळे
क्षणी वर्षे मेघातुन
क्षणी सोन्यात उजळे !
मध्यवयीन पाऊस
जरा संयमी नी शांत
कधीकाळचा प्रपात
दिसे झऱ्याच्या रूपात !
झुळझूळे निर्झरात
शुभ्र स्फटिकाचे पाणी
सारे मालिन्य सांडून
घेई आकाशा दर्पणी !
रात्र अथांग हिरवी
दिस अथांग हिरवा
दिवास्वप्नांनाही रंग
लाभे हिरवा हिरवा !
एक हिरवे साम्राज्य
मांडलिक रानवाटा
सारा सागर हिरवा
साऱ्या हिरव्याच लाटा !
पहाटेस अंगणात
शुभ्रकेशरी दर्वळ
प्राजक्ताच्या गंधालाही
हिरव्याचे लागे खूळ !
ओल्याचिंब पापण्यात
आगंतुक आले उन्ह
कुणी बांधिले ह्रदयी
इंद्रधनूचे तोरण !…..
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈