सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
अल्प परिचय
सांगली आकाशवाणी केंद्रात काँपेरर म्हणून पाच ते सहा वर्षे काम केले आहे.
त्यानंतर दैनिक दक्षिण महाराष्ट्र केसरी वृत्तपत्रात उपसंपादिका म्हणून सुमारे११वर्षे काम.
आकाशवाणीवरून प्रतिबिंब मालिकेसाठी लिखाण, जिल्हा वार्तापत्र,तसेच बाल नाट्य, ललित लेख,कविता यांचे प्रसासण. वृत्रपत्रासाठीसुध्दा लेखन .प्रासंगिक, कविता, लेख आदी. तसेच महिलांसाठी सखी पुरवणीसाठी काम केले आहे.
‘काही तुझ्या काही माझ्या’कथासंग्रह, ‘आरसे महाल’बालकथा संग्रह, तसेच ‘स्पर्शगंध’कविता संग्रह असे साहित्य प्रकाशित झाले आहे.
कवितेचा उत्सव
☆ श्रावणधारा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
श्रावण धारा अलबेली
वेड लावूनिया गेली
दिठी फुलूनिया आली
उमले एक एक पाकळी
लावण्याची तू गं खाण
नाही तुला जगाचे भान
पदी पैंजण झाले बेभान
खग विसरले गं तान
नादमयी तू पावन सरिता
कुंतल पाठीवरी रुळता
मोत्यांच्या लडी ओघळता
खळीदार हास्य फुलता
चमकते हे चांदणगोंदण
साज पाचूचे लाजे दर्पण
मोहमयी गे तुझे नर्तन
अवघी धरा दिली आंदण
शोभते ही सुवर्ण कांती
जशी गं वीज तळपती
आत्ममग्न तू सळसळती
उन्हे कोवळी तुला स्पर्शिती
गंधमळे फुलले अंगी
परिमळ ओला सुरंगी
इंद्रधनूच्या सप्तरंगी
रंगलीस तू अनुरागी
कवेत ये ना जरा साजणी
स्पर्श मलमली जावे भिजूनी
कायेचा ओला दरवळ मनी
ठेवतो मनतळी साठवूनी
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈