कवितेचा उत्सव
☆ सांज… ☆ कवी बी.रघुनाथ ☆
गाउलीच्या पावलांत
सांज घरा आली
तुंबलेल्या आंचळांत
सांज भरा आली
आतुरल्या हंबराचा
सांज कान झाली
शिणलेल्या डोळुल्यांचा
सांज प्राण झाली
माउलीच्या वातींतून
सांज तेज ल्याली
माउलीच्या गीतांतून
सांज भाव प्याली
माउलीच्या अंकावर
सांज फूल झाली
फुलासाठी निदसुरी
सांज भूल झाली
वहिनीच्या हातांतून
सांज सुधा झाली
वहिनीच्या हातासाठी
सांज क्षुधा झाली
वहिनीच्या मुखासाठी
सांज चंद्र झाली
वहिनीच्या सुखासाठी
सांज मंद्र झाली.
– कवी बी.रघुनाथ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈