श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ लोणच्याची बरणी… ☆
मांडणीवर ठेवलेली
लोणच्याची बरणी
टकमक पहात होती
त्या लिंबाकडं
लिंबाचंही लक्ष
होतंच तिच्याकडं
झाली दोघांची नजरानजर
हृदयाच्या घड्याळात
वाजला होता गजर
आले दोघे
लगेच भानावर
गेलं नाही ना प्रकरण
हे कुणाच्या कानावर
बरणीत उतरायची
इच्छा अनावर
मनातल्या भावनांनी पुरवला पिच्छा
सुरीनं पुरी केली त्याची इच्छा
जखमा झाल्या अंगभर
मीठ चोळलं जखमेवर
तिखट, हळद इतरांची
झाली होती युती
गरजेचीच होती
त्यांची ही कृती
धीर द्यायला आला
नंतर थोडा गूळही
आतड्याला पडलेला
होता थोडा पीळही
बरणी सोबत रहायचं
होतं काही दिवस
काही दिवसांनी करावंच
लागेल तिला मिस
हळूहळू कमी होत
चाललाय आता थर
एक दिवस सोडावच
लागणार आहे घर…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈