सौ. अस्मिता इनामदार
☆ कवितेचा उत्सव ☆ उंबरठा ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆
बाई आणि उंबरठा
नाते यांचे जुनेच आहे
घरादाराला बांधून ठेवण्याचे
ते एक दारच आहे…
स्वैपाकघर, माजघर
एवढेच तिचे विश्व होते
आखून दिलेल्या परिघाबाहेर
तिचे जिणे बंदिस्त होते…
उंबरठ्यावरचे माप ओलांडून
लक्ष्मी म्हणून तिचे स्वागत असे
तोच उंबरठा आज तिचा
वैरी म्हणून उभा दिसे…
उंबरठ्यापायी रामायण घडले
लक्ष्मणरेषेचे उल्लंघन झाले
परस्त्री म्हणून सीतेच्या नशिबी
दुर्दैवाचे फेरे आले…
आज बाई स्वतंत्र आहे
तिला तिची स्पेस आहे
संसाराच्या मर्यादेत
तरीही ती बंदीच आहे…
आजच्या फ्लॅट संस्कृतीत
हाय – फाय सर्व काही
मर्यादेने अडवणाऱ्या
उंबरठ्याला जागाच नाही…
© सौ अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈