श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 157
तो आकाशी भिरभिरणारा पतंग होता
रस्त्यावरती आला झाला भणंग होता
मठ नावाचा महाल त्याने उभारलेला
काल पाहिले तेव्हा तर तो मलंग होता
गंमत म्हणुनी खडा मारुनी जरा पाहिले
क्षणात उठला त्या पाण्यावर तरंग होता
काय जाहले भाग्य बदलते कसे अचानक
तरटा जागी आज चंदनी पलंग होता
चार दिसाची सत्ता असते आता कळले
आज गुजरला खूपच बाका प्रसंग होता
माझी गरिबी सोशिक होती तुझ्यासारखी
मुखात कायम तू जपलेला अभंग होता
घरात माझ्या तेलच नव्हते फोडणीस पण
खडा मिठाचा वरणामधला खमंग होता
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈