श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ मी राजा, तू राणी माझी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

(एक वास्तव)

आठवते का? काय आपुले ठरले होते! लग्नानंतर पहिल्या रात्री ?

स्पर्श बावरा वारा होता, साक्षीला अन्,

खिडकीच्या कानात सुगंधी फाया होता रातराणीचा

लाज हरवली होती गगनी ताऱ्यांनीही,

मिठी अनामिक पडली होती, श्वासांनाही… आठवते का?

 

त्या भेटीतच रचले होते, उंच मनोरे, स्वप्न फुलांचे !

म्हणालीस तू, या काळाच्या वटवृक्षावर,

बांधू आपण घरटे सुंदर, असेल ज्याला नक्षत्रांची सुंदर झालर,

इंद्रधनुची कमान त्यावर, गारवेल अन्,

कौलारांवर, वेलींच्या वेलांट्या असतील,

आणि मनोहर, दोन पाडसे गोजिरवाणी, बागडतील मग साऱ्या घरभर,

मीही म्हणालो, “हो गं!” होईल सारे मनासारखे,

आणि सहेतुक, एक जांभई दिली खुणेची,

हसलीस तू, मग मिटले डोळे… आठवते का?

 

हळू लागलो कानी नंतर, सलज्ज वदली तूही मग ते –

चावट कुठले – मी नाही गं अधीरता ती,

आणि हरवली कुशीत माझ्या, रात्र लाजरी… आठवते का?

 

अशाच रात्री आल्या गेल्या, कुठे हरवल्या? कुणांस ठाऊक?

उरल्या केवळ आठवणी त्या – गंध हरवल्या निर्माल्यागत –

उभारले घरकुल आपुले – पण उघड्यावर,

नक्षत्रांची होती झालर, अधांतरावर,

आणि पाडसे गोजिरवाणी – हमरस्त्यांवर,

नित्य उद्याचे स्वप्न पाहिले, ज्या नयनांनी,

त्या नयनांच्या पाणवठ्यावर, व्यथा मनाच्या भरती पाणी,

घट भरतो अन् भविष्यात भटकते, पुन्हा ती, आस दिवाणी,

आणि बरे कां ! त्या आशेच्या साम्राज्याचा

मी राजा, तू राणी माझी ! …..

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments