श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ तोरण ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
न्याय रक्षणा उभे ठाकले
शौर्य प्रभावी अभिमानाचे
सुंदर मंदिर पावित्र्याचे
राज्य हिंदवी शिवरायांचे
माय भवानी आणि जिजाऊ
पाठीराख्या दोन देवता
बीज पेरले मनात त्यांनी
वेड लावले स्वातंत्र्याचे
सह्यगिरीच्या कडे कपारी
हर हर महादेवाने घुमल्या
मर्द मावळे झाले गोळा
स्वराज्य ठरले स्थापायाचे
चांद्यापासून बांधण्याचीशीव
निशान भगवे फडकायाचे
किती प्रभावी ठरले होते
राज्य हिंदवी पण रयतेचे
रयतेचा तो रक्षण कर्ता
महाराष्ट्राला देव लाभला
रायगडावर स्वप्न नांदले
होते तेव्हा मानवतेचे
अन्यायाला पाजत पाणी
मुलुख मराठी पावन केला
विश्र्व आजही धडे गिरवते
शिवरायांच्या सात्विकतेचे
राज्य हिंदवी आदर्शाचे
पुन्हा आणखी होणे नाही
घरास तोरण बांधून जगतो
शिवरायांच्या आठवणींचे
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈