श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 131 – मैत्रीचं नातं…! ☆ श्री सुजित कदम ☆
मित्रांनो वेळ काढून भेटा एकदा
खूप खूप बोलायचंय…
हरवलेलं बालपण एकदा
पुन्हा जगून बघायचंय…!
क्रिकेट विट्टी दांडूचा
खेळ पुन्हा मांडूया
टेन्शन बिन्शन नको काही
एकदा मनसोक्त जगूया..!
नावं सोडून टोपण नावांनी
एकमेकांना चिडवूया
दुरावलेली मैत्री आपली
पुन्हा जवळ आणूया..!
मैत्री जरी कायम असली तरी
हल्ली भेट काही होत नाही
वर्ष वर्ष एकमेकांचे आपण
चेहरा सुद्धा पाहत नाही..!
रोजच्या पेक्षा थोडं जरा
वेगळं वळण घेऊया
आपणच आपल्या साठी
एकदा पुन्हा लहान होऊया..!
कितीही मोठं झालो तरी
आपली मैत्री अजून कायम आहे
आपल्या साठी आपला कट्टा
अजूनही तोच आहे…!
आणखी खूप बोलायचंय मित्रांनो
सारं शब्दात मांडता येत नाही
मित्रांनो तुमच्या शिवाय वयाचं
भान विसरता येत नाही…!
म्हणून म्हणतो मित्रानो
एकदा वेळ काढून भेटायला हवं
मैत्रीचं नातं आपलं पुन्हा
घट्ट करायला हवं…!
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈