श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 160
शब्दांचे मोती व्हावे, असे मागणे आहे
ते गळ्यात तू माळावे, असे मागणे आहे
हे सप्तक छान सुरांचे, शब्दांशी करते गट्टी
सुरातून अर्थ कळावे, असे मागणे आहे
कोठार कधी पक्षाच्या, घरात दिसले नाही
उदराला रोज मिळावे, असे मागणे आहे
दगडाच्या हृदयी पान्हा, हिरवळ त्यात रुजावी
पाषाणी फूल फुलावे, असे मागणे आहे
हृदयाचे फूल मला दे, नकोच बाकी काही
ते कर तू माझ्या नावे, असे मागणे आहे
तो गुलाब कोटावरचा, हृदयी दरवळणारा
ते अत्तर आत रुजावे, असे मागणे आहे
हे पुस्तक करकमलाचे, भाग्याच्या त्यावर रेषा
हातात रोज तू घ्यावे, असे मागणे आहे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈