श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 125 – भाकरी ☆
दिसरात राबतिया
माझी माय ही बावरी।
तरी तिला मिळेना हो
चार घास ती भाकरी।।
बाप ठेऊनिया गेला
उभा कर्जाचा डोंगर।
उभी हयात राबून
गळा फासाचा हो दोर।
मार्ग सारेच खुंटले
भर दिसा अंधारले।
दोन्ही पिलांना पाहून
बळ अंगी संचारले ।
शेण पाणी झाडलोट
धुणी भांडी ही घासते।
अधाशीही मालकीण
पाने तोंडाला पुसते।
हाता तोंडाचं भांडण
काही सरता सरेना।
किती राबते तरीही
पोट सार्यांची भरेना
कशी शिकवावी लेक
कसे करावे संस्कार ।
निराधार योजनेला
घूस खोरीचा आधार।
कथा दारिद्रय रेषेची
असे फारच आगळी।
लाभार्थीच्या यादीला हो
दिसे दिग्गज मंडळी।
माय म्हणे बापा बरी
अर्धी कष्टाची भाकरी।
लाचारीच्या जिण्यापरी
लाख मोलाची चाकरी
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈