श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 161
☆ गिळतोय राग आता… ☆
नावे तिच्या फुलांची केलीय बाग आता
सुस्तावल्या कळ्यांना येईल जाग आता
किमया अशी कशीही झाली मला कळेना
हलतो गुलाब तैसा डुलतोय नाग आता
ही जात लाकडाची झाली महाग इतकी
भावात चंदनाच्या विकतोय साग आता
चर्चा नका करू रे खड्डे नि पावसाची
खड्डेच जीवनाचा झालेत भाग आता
वाहून पीक गेले पोटास काय सांगू
जर भूक लागली तर गिळतोय राग आता
सूर्यास दोष देऊ सांगा अता कसा मी
वर्षाच लावते रे शेतास आग आता
तू चंद्र निरखुनी बघ आहेच डाग तेथे
शोधू नको उगाचच माझ्यात डाग आता
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈