सौ .कल्पना कुंभार
कवितेचा उत्सव
☆ पाऊस असाही… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆
प्रत्येकाचा पाऊस वेगळा
प्रत्येकाचं भिजण वेगळं ..
सरिवर सरी कोसळू लागता
थिजून जातं जग सगळं…
थेंब ओघळता गालावर
मन बुडून जाते गतकाळात..
थेंबांवर स्वार होऊनी
चिंब चिंब भिजलेल्या क्षणात..
प्रत्येक जण भिजत रहातो
डोळ्यातून पाझरू पहातो..
चिंब भिजलेल्या मनाला
समजाऊन सावरू पहातो…
पाऊस पडत रहातो रात्रं रात्र
शहारत जाते गात्र न गात्र..
थेंबांनी भिजू लागतात
कधीही न पाठवलेली पत्रं..
असाच पाऊस पडत रहातो
आठवण थेंब सांडत रहातो..
प्रेमिकांच्या विरहाचे गीत
पाना फुलांना सांगू पहातो..
🌹मनकल्प 🌹
© सौ .कल्पना कुंभार
इचलकरंजी
मोबाईल : 9822038378
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈