सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ वचन 💦 सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
सागरलाटा धावत येती
किनाऱ्या भेटण्याला
अडवी वारा भाग पाडतो
परत लोटण्याला
किती काळ तिष्ठत राही
किनारा मीलनाला
पुनरपि लाटा धाव घेती
किनारी मिटण्याला
आर्जवे तरी किती करावी
मनास उमगत नाही
अचल मी साद घालतो
त्यांस समजत नाही
वेल्हाळ या लाटा उसळती
अधिर जाहल्या मनी
कवेत घेण्या आतुरसा
दाटली असोशी मनी
पूर्तता कधी प्रतिक्षेची
आर्त आर्त उर्मी
अनंतकाळ वाट पाहीन
वचनची दिधले मी
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
चित्रा म्हणजेच वृंदा,
मिलनाची आस आतुरता आणि अनंत काळापर्यंत वाट पाहण्याची प्रेमिकांची विव्हल जिद्द तू लाटा आणि किनाऱ्याच्या सुंदर उपमानातून फार छान उभी केली आहेस.
लाटांबद्दल किनारी मिटण्याला ही काय अप्रतिम कल्पना आहे.
कविता खूप आवडली.
मनःपूर्वक अभिनंदन.⚘👍