सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ कवितेचा उत्सव ☆ दिवाळी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
दिवाळी आली.. दिवाळी आली
आली दिवाळी आली……..
तेजोमय ही वसने ल्याली
मंगलमय अति सुभग पाऊली
आनंद उधळत आली
आली, आली दिवाळी आली…
दारावरती तोरण
अंगणी ताजी सडा रांगोळी
अवतीभवती लखलखती
सांगती पणत्यांच्या ओळी
आली, आली दिवाळी आली…
पाऊल ठेवे जिथे जिथे ती
समृद्धीला येई भरती
दीप उजळूनी तिची आरती
करण्या सृष्टी सजली
आली, आली दिवाळी आली…
दूर तिथे पण काय जहाले
दिवाळीचे का पाऊल अडले
घुसमटलेले सावट आले
जीवांची किती काहिली
तेथे दिवाळी भांबावली……….
चोहीकडे दारिद्र्यची सांडे
अज्ञानाचे जमले तांडे
मनातले ते मनात मांडे
आयुष्य काळोखली
तेथे दिवाळी ही थबकली…….
वर्षामागुन वर्षे सरली
दुभंगून जणू सृष्टी गेली
सधन- निर्धनामधली पोकळी
वाढतची राहिली
तेथे दिवाळी जणू हरवली…….
फुलू दे हिरवळ समानतेची
झुळझुळ लकेर मानवतेची
विश्वबंधुता मनात फुलता
मिटेल ही पोकळी
येईल इथेही दिवाळी ……….
येऊ द्या इथेही दिवाळी…….
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुश्री मंजुषा मुळे – नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारी दिवाळीवरची सुंदर होकारात्मक कविता !!
मुळे यांची ” दिवाळी आली” कविता छान उद्बोधक