श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 167
☆ निशा सांगते… ☆
तेजोमय हा सूर्य नांदतो भाळावरती
ती लाली मग पसरु लागते ओठांवरती
श्वासासोबत तुझे नावही घेत राहते
नाव तुझे मी गोंदत नाही हातावरती
अंगावरती ऐन्याची ही चोळी आहे
तोच स्वतःला शोधत बसतो चोळीवरती
तरुण पणाला सांभाळाया दिला पदर पण
तोच पदर हा कसा भाळतो वाऱ्यावरती ?
निशा सांगते वेळ जाहली भेटायाची
नको उशी मज ठेविण डोके छातीवरती
अंधाराच्या गुहेत होतो रात्री दोघे
प्रभात काळी लाली दिसली गालावरती
फुले उमलली रात्रीमधुनी दरवळ सुटला
प्रसन्नतेचा भाव प्रगटला माळावरती
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈