श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 140 ☆ भक्त शिरोमणी… संत नामदेव ☆ श्री सुजित कदम ☆
भक्त शिरोमणी संत
रेळेकर आडनाव
नामवेद नामविस्तार
सांप्रदायी सेवाभाव…! १
वारकरी संप्रदायी
जन्मा आले नामदेव
दामाशेठ गोणाईला
प्राप्त झाली पुत्र ठेव….! २
गाव नरसी बामणी
जन्मा आले नामदेव
दामाशेठ गोणाईला
प्राप्त झाली पुत्र ठेव….! ३
सदाचारी हरिभक्त
शिंपी कुल नामांकित
हरि भजनाचे वेड
नामदेव मानांकित…! ४
जिल्हा हिंगोली आजचा
नामदेव जन्म भुमी
कार्तिकाची एकादशी
सांप्रदायी कर्म भुमी…! ५
भागवत धर्मातील
आद्य प्रचारक संत
भाषा भेद करी दूर
नामदेव नामवंत…! ६
बालपण पंढरीत
लागे विठ्ठलाचा लळा
जेवी घातला विठ्ठल
फुलवला भक्ती मळा…! ७
घास घेरे पाडुंरंगा
निरागस भक्ती भाव
अडिचशे अभंगात
दंग झाले रंक राव….! ८
दैवी कीर्तन कलेने
डोलतसे पांडुरंग
भावनिक एकात्मता
सारे विश्व झाले दंग…! ९
दैवी कवित्व संतत्व
चिरंतन ज्ञानदीप
रंगे कीर्तनाचे रंगी
नामदेव ध्येय दीप…! १०
औंढा नागनाथ क्षेत्री
नागराजा आळवणी
भक्ती सामर्थ्य अद्भुत
फिरे देवालय झणी…! ११
महाराष्ट्र पंजाबात
बाबा नामदेव वारी
गुरूमुखी लिपीतून
नामदेव साक्षात्कारी…!१२
नामदेवाचे कीर्तन
वेड लावी पांडुरंगा
भक्ती शक्तीचा गोडवा
भाव अभंगाच्या संगा . . . ! १३
विठ्ठलाची सेवा भक्ती
हेची जाहले संस्कार
निरूपण अध्यात्माचे
मनी जाहले साकार. . . ! १४
ज्ञाना, निवृत्ती ,सोपान
समकालीन विभूती
गुरू विसोबा खेचर
नामयाची ज्ञानस्फूर्ती . . ! १५
गौळण नी भारूडाचा
आहे अजूनही ठसा
जनाबाई ने घेतला
एकनाथी वाणवसा.. . ! १६
देशप्रेम आणि भक्ती
रूजविली नामयाने
भागवती धर्म शिखा
उंचावली संकीर्तने. . . ! १७
ग्रंथ साहिब ग्रंथात
नामदेव साकारला
हरियाणा, पंजाबात
प्रबोधनी आकारला. . ! १८
संत कार्य भारतात
नामदेव सेवाव्रती
हिंदी मराठी पंजाबी
शौरसेनी भाषेप्रती…! १९
संत नामदेव गाथा
बहुश्रुत अभ्यासक
शीखांसाठी मुखबानी
भक्ती भाव संग्राहक…! २०
जेऊ घातला विठ्ठल
पायरीची विट झाला
भक्ती मार्ग उपासक
भजनात दंग झाला . . . ! २१
पायरीच्या दगडाचा
महाद्वारी मिळे मान
आषाढाची त्रयोदशी
नामदेव त्यागी प्राण…! २२
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈