श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 132 – बाळ गीत – रोजच जाईन शाळेला ☆
पाटी-पुस्तक नवीन दप्तर घेऊन रोजच वेळेला ।
मित्रासंगे हासत खेळत जाईन रोजच शाळेला।।धृ।।
शाळा माझी भासे मजला जणू जादूची ही नगरी ।
तशीच ताई प्रेमळ भारी अवतरली जणू सोनपरी ।
लहान होवून तेही खेळे धमाल येते शिकण्याला ।।१।।
चित्र जुळुन गोष्टी बनती अक्षरांच्या गाड्या पळती ।
समान आकार समान चित्रे हसत खेळत येथे जुळती
अक्षर-अक्षर जुळवून आम्ही स्वतःच शिकलो वाचायला ।।२।।
गणिताची ही मुळी न भीती काड्या आणि बियाही जमती
नोटा नाणी काड्या मोजता गणिताची ही कोडी सुटती।
वजन मापे घड्याळ काटे आम्हीच घेतो फिरवायला।।३।।
झाडे वेली फुले नि पाने बागही लागली फुलायला।
फुलपाखरे अणिक पक्षी येतील आम्हा भेटायला।
त्यांच्यासंगे खेळ खेळूनी रंगत आली शिकण्याला ।।४।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈