श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 141 ☆ संत मुक्ताबाई… ☆ श्री सुजित कदम ☆
ज्ञाना निवृत्ती सोपान
बंधू संत मुक्ताईचे
सांप्रदायी प्रवर्तक
बाळकडू अध्यात्माचे…! १
आदिमाता मुक्ताईस
ब्रम्हचित्कलेचा मान
मंत्र सोहम साधना
ज्ञानदेव देई ज्ञान…! २
करी मुक्ता उपदेश
गुरू बंधू ज्ञानदेवा
केले लेखन प्रवृत्त
दिला ज्ञानमयी ठेवा…! ,३
बेचाळीस रचनांनी
सजे ताटीचे अभंग
मुक्ता बाई योग राज्ञी
विश्व कल्याणात दंग..! ४
ज्ञानेश्वर संवादाने
दिली सनद मानाची
झाली प्रकाश मुक्ताई
ज्ञानगंगा ज्ञानेशाची…! ५
भक्त श्रेष्ठ मुक्ताबाई
प्रबोधन गुणकारी
ताटीच्याच अभंगाने
झाली संकट निवारी…! ६
गुरू विसोबा खेचर
संकीर्तनी विवेचन
संतश्रेष्ठ सहवास
अध्यात्मिक प्रवचन…! ७
योगीराज चांगदेवे
मुक्ताईस केले गुरू
पासष्ठीचा अर्थबोध
गुरू शिष्य नाते सुरू…! ८
अंगाईच्या अभंगांने
मुक्ता झाली रे मुक्ताई
ज्ञानबोध हरिपाठ
अनुबंध मुक्ताबाई…! ९
नाथ संप्रदायातील
पहिल्याच सद्गुरू
मुक्ताबाई सांगतसे
उपदेश मनीं धरूं…! १०
मुक्ताबाई मुक्तीकडे
करी जीवन प्रवास
संत साहित्य प्रेरक
लाभे संत सहवास…! ११
गुरू गोरक्षनाथांचा
झाला कृपेचा वर्षाव
संजीवन अमृताचा
पडे सर्वांगी प्रभाव..! १२
समाधीचे आले अंग
मुंगी उडाली आकाशी
धन्य धन्य मुक्ताबाई
झेप घेई अवकाशी…! १३
जळगावी तापीतीरी
मुक्ता स्वरूपा कारात.
वैशाखात दशमीला
मुक्ता मुक्तीच्या दारात…! १४
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈