☆ कवितेचा उत्सव ☆ राहुंन गेलं बोलायचं नसतं ☆ श्री विद्याधर काठे ☆
कसं जगायचं, कसं जगायचं,
हे कुणालाच माहीत नसतं…
न उमगणारं कोडं, उमगलेलं अगदी थोडं…
आयुष्य असं असतं…
राहुंन गेलं बोलायचं नसतं
जगतांना फक्त जगायचं असतं…
एकेक क्षण निसटतांना पहायचं असतं…
हसायचं, रडायचं, धडपडल्यावर पुन्हा उठून उत्साहाने चालायचं असतं…
कळलेलं, न कळलेलं, पण त्या वेळेशी सूर जुळलेलं…
आयुष्य असं असतं…
राहुंन गेलं बोलायचं नसतं
देत असतं की नेत असतं, काही केल्या कळत नसतं…
दोन क्षणांचं गणित कधीच जुळत नसतं…
साठवायचं की आठवायचं, हे ही ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं…
कधी मैफल रंगलेलं, कधी खूपंच मरगळलेलं…
आयुष्य असं असतं…
राहुंन गेलं बोलायचं नसतं
कसं जगायचं विचारतांना, जगणं विसरायचं नसतं…
प्रवास चुकला की काय, म्हणून वाटेतच उतरायचं नसतं…
गोंधळलेल्या क्षणी बावरलेलं, पण आपण सावध होऊन सावरलेलं…
आयुष्य असं असतं…
राहुंन गेलं बोलायचं नसतं
आपणच घडवलेलं आयुष्य फक्त प्रश्न नसतं…
स्वतःत दडवलेलं, बाहेर शोधायला लावणारं उत्तर असतं…
प्रश्न एकच ठेवून , अनेक पर्याय देणारं,पण उस्फुर्तपणे सामोरं जायचं असतं
आयुष्य असंच असतं…
आयुष्य असंच असतं…
राहुंन गेलं बोलायचं नसतं
© श्री विद्याधर काठे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈