श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 137 – हरवलेले माणूसपण ☆
समृध्दीने नटलेल घर पाहून हरवले देहभान ।
शोधून सापडेना कुठेही हरवलेले माणूसपण ।।धृ।।
कुत्र्या पासून सावध राहा भलीमोठी पाटी।
भारतीय स्वागताची आस ठरली खोटी।
शहानिशा करून सारी आत घेई वॉचमन ।।१।।
झगमगाट पाहून सारा पडले मोठे कोडे ।
सोडायचे कुठे राव हे तुटलेले जोडे ।
ओशाळल्या मनाने कोपऱ्यात ठेऊन ।।२।।
सोफा टीव्ही एसी सारा चकचकीतच मामला।
पाण्यासाठी जीव मात्र वाट पाहून दमला ।
नोकराने आणले पाणी भागली शेवटी तहान ।।३।।
भव्य प्रासादातील तीन जीव पाहून ।
श्रीमंतीच्या कोंदणाने गेलो पुरता हेलावून ।
चहावरच निघालो अखेर रामराम ठोकून।।४।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈