श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 174
☆ संयम ठेवा… ☆
झापड होती विद्वत्तेची डोळ्यांवरती
संशय घेती हे ज्ञानाच्या ज्ञानावरती
फळे लगडली हिरवा होता पाला तेव्हा
आज उडाळा पाचोळा हा वाऱ्यावरती
विश्वासाच्या पायावरती होय उभा मी
कधीच नाही लावत पैसे घोड्यावरती
दोन पाकळ्या त्याच्यावरती लाली कायम
ओवी नाही येत कुणाच्या ओठावरती
विवेक होई जागा करता ध्यानधारणा
संयम ठेवा आता थोडा रागावरती
पाठीवरती कुंतल ओले तुझ्या रेशमी
दवबिंदूचे छोटे तारे त्याच्यावरती
तुझ्या मनीचा मोर नाचतो त्याला पाहुन
मोर नाचरा हवा कशाला पदरावरती
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈