श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ एक होता म्हसोबा…👹 ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

एक होता म्हसोबा,

एक होती हडळ,

म्हसोबा रहायचा पिंपळावर,

हडळ रहायची चिंचेवर — ॥

 

हडळीला नव्हता नवरा,

म्हसोबाला नव्हती बायको,

म्हसोबा बोलला लगिन करू,

पण हडळ म्हणाली नक्को !

 

हवा कशाला डोक्याला या,

संसाराचा ताप

चैन मज्जा करू, कशाला

व्हावे आई बाप — ॥

 

चंगळ केली, चैनही केली,

रिलेशनाची मज्जा

इच्छा नसता झाला मुलगा

नांव ठेविले मुंजा — ॥

 

ताडमाडसा झाला मुंजा

सदैव खा खा खाई

काय देऊ तुज, हडळ म्हणे त्या

माझी हाडे खाई — ॥

 

लग्न करिन मी, म्हणे मज हवी

नवरी जणु वाघिण

पसंत मजला वडाखालची

नाक फेंदरी जखिण — ॥

 

लग्न लागले, घरातली पण

हरवुन गेली शांती

भांडभांडती खिंकाळति अन्

झिंज्याही खेचती — ॥

 

विचार केला चौघांनी मग

माणुस अपुला भाऊ

तोच शहाणा त्याच्यापाशी

शिकावया जाऊ — ॥

 

बघुन माणसे बसले त्यांना

धक्क्यावर धक्के

स्वार्थी, कपटी, कारस्थानी

खेळति पंजे छक्के — ॥

 

फुकट लाभता पैसा सत्ता

समाधान ना मिळे

हाव अशी की तोंडामधुनी

लाळ खालती गळे — ॥

 

वाघ नि कोल्हे तसे लांडगे

हसून नाटक करिती

संधी मिळता तुटून पडती

विसरुन नाती गोती — ॥

 

आई ढोंगी बाप कोडगा

शरम नसे ना लाज

माणसातल्या मुंजांना मग

चढला भारी माज— ॥

 

हडळ, म्हसोबा, जखीण, मुंजा

रडती पश्चात्तापे

माणुस गेला किती पुढे अन्

हरलो आम्ही भुते — ॥

 

भूतलोकि जातांना म्हणती

अनुभव हा अद्भूत

खरंच सांगतो माणसापरी

नाही दुसरे भूत — ॥ 🤣

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments