श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ उसनी गाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
डोळ्यात वाचली मी
होती तुझ्या कहाणी
तेथे समर्पणाची
मज भेटली निशाणी
निरखून डोह गहीरा
अंदाज घेतला मी
मग खोल खोल पाणी
पोहून पाहिले मी
त्या काळजात दडले
ते स्वप्न जाणले मी
स्वप्नात आशयाचे
घर छान बांधले मी
तू शब्द दिलेला तेव्हा
झेलून घेतला हाती
मजबूत कराया धजलो
मी दोघा मधली नाती
शेवटच्या थांब्या साठी
भरधाव धावणे नडले
घसरून तोल जाताना
विपरीतच सारे घडले
आताही रोज फुला़ंचा
मज काच जाचतो भारी
पण रोज तुझ्या स्मरणाची
मन मारून घडते वारी
वठलेल्या झाडाला ही
मी बसतो घालत पाणी
हट्टाने म्हणतो सारी
दुस-यांची उसणी गाणी
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈