श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 148 ☆ बाप…! ☆ श्री सुजित कदम ☆
बाप देवळातला देव पुजा त्याचीही करावी
आई समान काळजात मुर्ती त्याचीही असावी..
बापाच्याही काळजाला असे मायेची किनार
त्याच्या शिवीतही असे ऊब ओवीची अपार..
पोरांसाठी सारे घाव बाप हसत झेलतो
स्वतः राहून उपाशी घास लेकराला देतो..
बापाच्या कष्टाला नाही सोन्या चांदीचे ही मोल
त्याच्या राकट हातात आहे भविष्याची ओल..
लेकराला बाप जेव्हा त्याच्या कुशीमध्ये घेतो
सुख आभाळा एवढे एका क्षणांमध्ये देतो..
बापाला ही कधी कधी त्याचा बाप आठवतो
नकळत डोळ्यांमध्ये त्यांच्या पाऊस दाटतो..
कधी रागाने बोलतो कधी दुरून पाहतो
एकांताच्या वादळात बाप घर सावरतो..!
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈