श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ काफिल्याची खूण… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(षडाक्षरी)
होते गुंतलेले
जेथे पंचप्राण
झालो हद्दपार
त्याच गावातून
अनवाणी पाय
भेगाळली भूई
वाटले फाटले
आभाळच डोई
काळजावरती
ठेवोनिया हात
अनाम दिशांना
होतो मी हिंडत
वाटेवर एका
प्रवासी भेटले
नव्हती ओळख
तरीही थांबले
सोडले उसासे
वाचून कहाणी
कौतुके ऐकली
भंगलेली गाणी
दिली प्रेमभरे
पाठीवर थाप
वाटून घेतले
झोळीतील शाप
शांतावले दुःख
त्यांच्या संगतीत
आसूत हासले
जीवनाचे गीत
सगळ्यांच्या अंती
भिन्न झाल्या वाटा
वळणावरती
उभा मी एकटा
पावलांचे ठसे
दिसती अजून
डोळियात चिंब
काफिल्याची खूण !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈