सौ. विद्या वसंत पराडकर
कवितेचा उत्सव
त्रिवार जयजयकार ☘️ सौ. विद्या वसंत पराडकर ☆
त्रिवार जयजयकार सर्मथा,
त्रिवार जयजयकार सर्मथा,
दशदिशांनी गर्जे अंबर
महाराष्ट्र गाई तुझे सुस्वर
त्रिवार जयजयकार
यवनांपासून करूनी रक्षण
स्वदेश,स्वधर्माचे करुनी पालन,
जाणून जिजाईचा मनोदय
स्वातंत्र्य सूर्याचा केला उदय.
त्रिवार जयजयकार
समाज जागृती चे बांधून कंकण,
मंगल आचरणाची शिकवण,
विषय,विकारा दुय्यम लेखून,
न्याय नीती चे केले पालन.
दासबोधाचे अप्रतिम लेणे,
दासांसाठी तुवा कोरिले,
भवसागर हा पार कराया
दीपस्तंभ जाहले समर्था
त्रिवार जयजयकार.
विवेक वैराग्याची शिदोरी
दासाहाते देवूनी अनमोल,
प्रपंच परमार्थाची घालूनी सांगड
बोधी अध्यात्म सारं अमोल
त्रिवार जयजयकार.
शक्ती युक्ती चार करुनी संगम
दासांसी संवादे हृदयंगम
जिवाशिवाचा घालूनी मेळ
परिवर्तिला नियतीचाखेळ
त्रिवार जयजयकार.
दासबोध हे तुझेच रूप
अमरत्वाचे असे प्रतीक
नश्र्वर देहाची सोडूनीआस
प्रबोधे आत्मारामाची धरा हो कास
त्रिवार जयजयकार.
मानवतेचा खरा पुजारी
समानतेचे चित्र चितारी
सामर्थ्याची असे वैखरी
कर्तृत्वाची उत्कृष्ठ भरारी
त्रिवार जयजयकार.
अखिल जगाच्या वंद्य पुरूषा
अस्मितेच्या नवोन्मेषा
मानवतेच्या नीलांकांक्षा
त्रिवार वंदन तुला
समर्था त्रिवार वंदन तुला
© सौ विद्या वसंत पराडकर
वारजे पुणे.
ई मेल- [email protected]
मो.नंबर – 91-9225337330
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈