कवितेचा उत्सव
☆ हे कविते… ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆
अवेळी तुझं येणं नसतंच कधी
दस्तक देतेस तू तुझ्या आर्ततेचे
झंजावत असतेस तू …
घुसमटलेल्या हल्लकल्लोळांचा
घोंगावणारा वारा असतेस तू…
पिंगा घालणाऱ्या भावभावनांचा
कोसळणारा धबधबा असतेस तू…
उचंबळून येणाऱ्या आर्त हुंदक्यांचा
झेपावणारा झोत असतेस तू…
उत्तुंग भरारी घेणाऱ्या अग्नीपंखांचा
खळखळणारा झरा असतेस तू…
हर्षोल्लासाने चिंब झालेल्या सुखांचा
प्रज्वलित करणारा किरण असतेस तू..
पथ चुकलेल्यासाठी उचित मार्गदर्शकांचा
धगधगणाऱ्या ज्वाळा असतेस तू…
अन्यायांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या सत्यतेचा
भळभळणारा जखमी प्रवाह असतेस तू…
अस्तित्वासाठी झगडलेल्या तीव्र वेदनांचा
ओघळणारा अश्रू-प्रवाह असतेस तू…
मनतळ्यातील थिजलेल्या यातनांचा
हे कविते, तुझ्या अनेक रूपांनी
तू समोर येऊन अवेळी उभी ठाकतेस.
अगदी अचानक…
© सुश्री पार्वती नागमोती
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈