सौ.मंजुषा सुधीर आफळे
कवितेचा उत्सव
☆ देशाटन… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆
जग भ्रमंतीचा थोर
आनंद किती वर्णावा
ज्ञान ठेवा मिळवण्या
मनी उत्साह असावा
भौतिक त्या साधनांनी
जग समीप भासते
स्वकर्तृत्व जागवीत
ती देशाटन करते
अंतरा अंतरावर
वेशभाषा निराळीच
परी सूर्य चंद्र तोच
मूळ गाभा, सृष्टी तीच
सुखदुःख मानवाचे
सर्वत्र असे सारखे
तरी प्रेमळ नात्यास
कुणी न व्हावे पारखे
बुद्धी कौशल्याचा कस
साथ घेते अध्यात्माची
संघर्ष तो झेलताना
जोड आत्मविश्वासाची
चूल मुलं सांभाळून
संस्कारांना ती जपते
साता समुद्रा पार ही
ती वंदनीय ठरते
याची देही याची डोळा
पाहा, जे नितांत सुंदर
यशापुढे न पडावा
माय भूमीचा विसर.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈