श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 177
☆ भुरळ… ☆
नच बोलावता आला, कसा भ्रमर जवळ
पाकळ्यांच्या मिठीमध्ये, होता घुसला सरळ
रात्रभर आडकलं, आत पाखरू वेंधळ
झाला जामिन मंजूर, त्याचा होताच सकाळ
फुलासाठी सारे प्रेम, फूल होतेच मधाळ
गुंजारव करताच, पडे फुलाला भुरळ
सूर्यकिरणांचा मारा, त्यानी होते होरपळ
भुंगा घालेतोय वारा, देई आनंद केवळ
थोडी पराग कणात, लागे कराया भेसळ
मध तयार घेईल, जेव्हा मिसळेल लाळ
फूल धरु पाहे त्याला, पळे पाखरू चपळ
नशिबात दोघांच्याही, होता विरह अटळ
दोन प्रेमीकांच्यामध्ये, कोण खेळतो हा खेळ
गंधाळल्या त्या क्षणाची, आहे तशीच ओंजळ
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈