श्री मुबारक बाबू उमराणी
☆ कवितेचा उत्सव : इंद्रधनु! ☆ श्री मुबारक उमराणी ☆
चालतांना चाललीस
गीत उद्याचे ते गात
मनी माझ्या पेटवीत
ह्दयी प्रेमाची वात
तुझ्या सवे चाललो मी
प्रेम उद्याचे भरत
स्वर्ग सुखानंदी मीही
तुज ह्दयी धरत
झाडीवेली नाचतात
फुल सुगंधाचे गीत
मनीमोर रानभर
पंखफुले गंध पित
खळखळ वाहे झरा
थेंब मोती अंगावरी
चिंब चिंब भिजतांना
भासे रानस्वप्न परी
ओल्या तुझ्या कुंतलास
चुंबे गवताचे पाते
मनोमनी फुलतांना
फुल तुझे गुण गाते
पडे प्रतिबिंब तुझे
लहानग्या त्या झ-यात
मंद मंद लहरत
निनांदे दरीखो-यात
पक्षी सारे बोले तुला
गीत श्रावणी ते म्हणू
फांदीवरी झुलतच
होऊ दोघे इंद्रधनु
© श्री मुबारक बाबू उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈