सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
अल्प परिचय
प्रणिता प्रशांत खंडकर (पूर्वाश्रमीची… ललिता कमलाकर कऱ्हाडकर)
जन्म आणि शालेय शिक्षण… शहापूर, जि. ठाणे.
महाविद्यालयीन शिक्षण.. मुलुंड काॅलेज आॅफ काॅमर्स… बी. काॅम.
एल. आय. सी. मध्ये छत्तीस वर्षे नोकरी करून, प्रशासनिक व्यवस्थापक या पदावरून नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.
एल. आय. सी. च्या मासिकं, त्रैमासिक यांमधून मराठी तसेच हिंदी कविता, कथा प्रसिद्ध आणि विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके.
‘अलवार’ हा कवितासंग्रह आणि ‘ अनाहत’ हा कथासंग्रह प्रसिद्ध.
कवितेचा उत्सव
☆ निरोप… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆
(एका भारतीय सैनिकाच्या नववधूच्या भावना.. लग्नानंतर दोनच दिवसांनी तिचा पती कर्तव्यपूर्तीसाठी सीमेवर जायला निघाला आहे. ती त्याला सांगतेय…)
मी आताच होता भरला,
हातात चुडा हा हिरवा.
अन् रंग मेंदीचा हिरव्या,
नुकताच लाल हा झाला.
मी भाळावर रेखि येला,
पूर्णचंद्र, सौभाग्याचा.
या गळ्यात नाही रूळला,
सर मणी मंगळसूत्राचा.
शेजेवर विखुरलेला
हा गंध फुलांचा ताजा,
ओठांनी कसा स्मरावा,
तो स्पर्श तुझा निसटता.
ठाऊक आहेच मजला,
कर्तव्याप्रतीची तव निष्ठा,
पुसुनी क्षणात अश्रूंना
मी औक्षण केले तुजला.
हा वीरपत्नीचा बाणा,
मी अंगिकारला आता,
तू सुपुत्र भारतभूचा,
अभिमान तुझा तिरंगा.
जोडून दोन्ही मी हाता,
प्रार्थीन या भगवंताला.
विजयश्री लाभो तुजला,
रक्षावे मम सौभाग्याला.
भेटीची तुझ्या ही प्रतिक्षा,
राहिल क्षणोक्षणी मजला.
विजयाची तुझिया वार्ता,
सुखवू दे मम गात्रांना.
© सुश्री प्रणिता खंडकर.
सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈