श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ जिव्हाळ्याची गावे सारी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
जिव्हाळ्याची गावे सारी
मागे आता दूरदूर
संपलेल्या प्रवासाची
गंतव्याला हूरहूर !
लख्ख चमकावी वीज
जावी विझून क्षणात
तसा वाटे जन्म सारा
सरलेला निमिषात !
जीर्णशीर्ण डायऱ्यांचे
फडफडे पान पान
भोगलेल्या आयुष्याची
श्रवणी ये मंद धून !
आषाढाच्या रानी तेव्हा
मोर स्वच्छंद नाचला
गेला झडुनिया सारा
इंद्रधनूचा पिसारा !
कधीचेच नि:संदर्भ
गावातील माझे घर
शेतमळ्यांच्या मध्यात
माझे बोडके शिवार !
भर दिवसाही येथे
अपरात्रीची शांतता
स्वगृहा यजमानाची
वाटे झाली भूतबाधा !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈