श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ सर… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
जीवलग पावसाच्या
आल्या लडिवाळ सरी
आठवांच्या पाखरांना
थिटी मनाची ओसरी
भेगाळल्या आयुष्याची
झाली साय तशी माती
काळोखल्या काळजात
उजळल्या फूलवाती
थबकली आसपास
दूरावलेली पाऊले
चिंब पागोळ्यात जीणे
जीवा माहेर भेटले
आर्त स्वरांची जाहली
धुंद सुरेल मैफल
तृप्तावली..ओलावली
उलघाल.. घालमेल
डहूळली अंतरीची
स्तब्ध शांतता नीरव
क्षणभरासाठी झाले
सुने आयुष्य उत्सव
(नाही आषाढ-श्रावण
तरी आली कशी सर..?
कसा थांबता थांबेना
डोळी दाटलेला पूर……)
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈