श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ उघडुन डोळे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त : पादाकुलक)
☆
उघडुन डोळे सताड अपुले
तपशीलासह जग निरखावे
मिटून लोचन कधी आपुले
अंतर्यामी खोल बुडावे !
☆
एक फूल पण जन्मच गंधित
दो किरणांनी नभ उजळावे
दोन क्षणांचे अमृत चंचल
मातीच्या कुंभात भरावे !
☆
कधी नभातुन कोसळतांना
डंख स्वतःला स्वतः करावे
पतनाच्या मग राखेतुनही
फिनिक्स होवुन पुन्हा उडावे !
☆
चुका तयांच्या होत्या क्षुल्लक
सजा तुझी पण प्राणांतिक रे
तोडिलेस तू तुझेच लचके
चिंतन हेही कटू करावे !
☆
उत्कट व्याकुळ घन बरसाया
परी भिजाया नाही कोणी
तेजोभंगित दातृत्वाचे
शल्य मूक हे हृदी धरावे !
☆
कोण इथे रे अजातशत्रू
जन्मच जेथे एक रणांगण
निशाण निवडुन तूही अपुले
रणधर्माने रण झुंजावे !
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈