श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ अभंग कीर्ती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
घर हलके हलके माझे
फिरताना वारे फरते
पण उंबरठ्यावर पणती
वा-यात वादळी जळते
अस्तित्व मनाला माझ्या
माझेच अविरत छळते
वळणाच्या खडतर वाटा
चढताना मन अवघडते
नेमक्या अनामिक जागी
निरगाठ मनाला बसते
मग रित्या रित्या देहाचे
जगणे ही खडतर बनते
ही ओढ जीवाला कसली
कसले हे अनघड नाते
आयुष्य दळाया साठी
नियतीचे फिरते जाते
पाण्यात उथळ असताना
काठावर येता येते
पण खोल गोल पाण्यातच
पडतात जीवाला गोते
झोकून दिल्यावर जगणे
माझेपण प्रचिती देते
जगताना दुसऱ्या साठी
जगण्याचे सार्थक होते
तेजोमय जगता येणे
भाग्याचे लेणे ठरते
पण स्वार्थ उपजतो तेव्हा
मरणांची कत्तल होते
हे कठीण काम जगण्याचे
सर्वांच्या पुढती असते
माणुसकी जपतो तेव्हा
मग वाळवंट ही फुलते
चिखलातच फुलती कमळे
हे खरेच वास्तव आहे
पण अभंग कीर्ती साठी
हौतात्म्यच पदरी पडते
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈