सुश्री शोभना आगाशे
कवितेचा उत्सव
☆ माझा प्रवास… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆
शाळेत लहानपणी शिकवलं होतं।
पाण्याची वाफ व वाफेचं पाणी होतं॥
मास्तरांनी जणु जीवनाचं सारच सांगितलं होतं।
जरी ते तेंव्हा त्यांनाही समजलं नव्हतं॥
सत्य हे कळता कळता सत्तर वर्ष सरली।
जगण्यात मजा तेंव्हाच आली
जेंव्हा मरणातली कळली॥
जगणं म्हणजे जुनं होणं तर मरणं नूतनीकरण।
ते नको असेल तर जावे संतांना शरण॥
जमिनीतून मुळांत आणि मुळांतून खोडात।
खोडातून पारंबीत अन् पुनःश्च जमिनीत॥
माझा न संपणारा प्रवास सुरूच आहे।
कैवल्याची आस तरीही टिकून आहे॥
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈