श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 152 ☆ संत जनार्दन स्वामी…! ☆ श्री सुजित कदम ☆
जन्मा आले जनार्दन
देशपांडे घराण्यात
कृष्णातीरी औदुंबरी
दिला वेळ चिंतनात..! १
संत जनार्दन स्वामी
कर्मयोगी उपासक
एकनाथ मानी गुरू
राजकार्यी प्रशासक…! २
यवनांची केली सेवा
देवगिरी गडावर
पद किल्ला अधिकारी
गिरी कंदरी वावर…! ३
धर्मग्रंथ पारायणे
एकांतात रमे मन
दत्तभक्ती ज्ञानबोध
धन्य गुरू जनार्दन. ४
संत साहित्य निर्मिती
लोक कल्याणाचा वसा
संत जनार्दन स्वामी
आशीर्वादी शब्द पसा….! ५
गुरू चरित्राचे आणि
ज्ञानेश्वरी पारायण
तीर्थक्षेत्री रममाण
संत क्षेष्ठ जनार्दन…! ६
जनार्दन स्वामी शिष्य
एकनाथ जनाबाई
दत्तात्रेय अनुग्रह
गुरू कृपा लवलाही…! ७
सुरू केली जनार्दने
दत्तोपासनेची शाखा
श्रीनृसिंह सरस्वती
नाथगुरु पाठीराखा…! ८
दत्त जाहला विठ्ठल
देव भावाचा भुकेला
निजरूप हरिभक्ती
दत्त कृष्ण एक केला…! ९
स्वानंदाचा दिला बोध
परमार्थ शिकविला
स्वयमेव गुरू कृपा
भक्तीभाव मेळविला…! १०
आदिनारायण अर्थी
दत्तात्रेय जनार्दन
गुरू परंपरा दैवी
पांडुरंगी संकर्षण…! ११
दत्त दर्शनाचा लाभ
बोधदान दिक्षा दिन
गुरू शिष्य दोघांचाही
नाथषष्ठी स्मृती दिन..! १२
पुण्यतिथी महोत्सव
हरिपाठ संकीर्तन
मठ आणि आश्रमात
सेवा भाव समर्पण…! १३
सुर्यकुंड दुर्गातीर्थ
रम्य भावगर्भ स्मृती
संत जनार्दन स्वामी
अध्यात्मिक फलश्रृती…! १४
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈