कवितेचा उत्सव
☆ प्रतिबिंब… ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆
मीच मला जन्माला घालताना
भासे प्रतिबिंब तुला पाहताना
आसवांची जलधारा
नेत्रातून अखंड वाही
गर्भांकुरातील अंकुर
जगण्याचे दुःख साही
मीच मला जन्माला घालताना
भासे प्रतिबिंब तुला पाहताना
एकसंध धवल मळभ
घट्ट तिमिर स्थितप्रज्ञ
वाट..ग्रहण सुटण्याची
जणू सारे बंध अनभिज्ञ
पहारा आहे तुझ्यावर, जन्मताना
तरीही..होईल हर्ष तुला पाहताना
येशील घेऊन प्रतिबिंब
माझ्यातलीच मी होऊन
तरणोपाय नाही सृष्टीस
बीजांकुरण नव्याने रुजून
आयुष्य भरडणार स्वत्व जोखताना
कष्टाचे चीज होईल तुला पाहताना
विश्वाची जननी असे नारी
काली,दुर्गा,लक्ष्मी,सरस्वती
अधर्माचा विनाश करण्यास
नानाविध रूप घेई संस्कृती
आनंदाला उधाण येईल तू जन्मताना
जीवनाचा सोहळा होईल तुला पाहताना
मीच मला जन्माला घालताना….
भासे प्रतिबिंब तुला पाहताना…
© सुश्री पार्वती नागमोती
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈