श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 180
☆ जन्मदर… ☆
रावणांचा जन्मदर हा वाढलेला
भ्रूण स्त्रीचा उकिरड्यावर फेकलेला
लग्नसंस्थेचाच मुद्दा ऐरणीवर
अन् तरीही माणसा तू झोपलेला
साधु संताचे अता संस्कार नाही
वासनेचा डोंब आहे पेटलेला
पायवाटा नष्ट केल्या डांबराने
कृत्य काळे आणि रस्ता तापलेला
कोणताही पक्ष येथे राज्य करुदे
अन्नदाता दिसत आहे त्रासलेला
पाय मातीवर म्हणे आहेत त्याचे
गालिच्यावर तो फुलांच्या चाललेला
छान संस्कारात सारे वाढलेले
का तरीही एक आंबा नासलेला ?
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈