श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 182
☆ चेहरा… ☆
कधी शब्द तर कधी चेहरा खोटा निघतो
असा चेहरा जरी बोलका उघडा पडतो
लहान मासा सुटून जातो अडकत नाही
अशाच वेळी विशाल मासा अलगद फसतो
जरी गव्हाचा घरात नाही माझ्या कोंडा
तरी चुलीवर मनात मांडे कायम करतो
कठीण होते कठीण आहे जीवन कायम
गरीब आहे भुकेस घेउन वनवन फिरतो
कधी न वर्षा प्रसन्न झाली माझ्यावरती
उन्हात आहे जरी उभा मी तरिही भिजतो
नभात तारे मनी शहारे गोंडसवाणे
अशा क्षणांना मिठीत घेण्यासाठी जगतो
गुलाब, चाफा असो नसो त्या डोईवरती
सुवर्ण चाफा मनात माझ्या रोजच फुलतो
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈