श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 156 ☆ संत कबीर… ☆ श्री सुजित कदम ☆
सत्य कर्म सिद्धांताचे
संत कबीर द्योतक
पुरोगामी संत कवी
दोहा अभंग जनक…! १
ज्येष्ठ पौर्णिमेचा दिन
कबिरांचा जन्म दिन
देव आहे बंधु सखा
जपू नाते रात्रंदिन….! २
कर्म सिद्धांताचे बीज
संत कबीरांची वाणी
धर्म भाषा प्रांतापार
निर्मियली बोलगाणी….! ३
सांगे कबिराचे दोहे
सोडा साथ अज्ञानाची
भाषा संस्कृती अभ्यास
शिकवण विज्ञानाची…! ४
बोली भाषा शिकोनीया
साधलासे सुसंवाद
अनुभवी विचारांना
व्यक्त केले निर्विवाद…! ५
एकमत एकजूट
दूर केला भेदभाव
सामाजिक भेदभाव
शोषणाचे नाही नाव…! ६
समाजाचे अवगुण
परखड सांगितले
जसा प्रांत तशी भाषा
तत्त्वज्ञान वर्णियले…! ७
राजस्थानी नी पंजाबी
खडी बोली ब्रजभाषा
कधी अवधी परबी
प्रेममयी ज्ञान दिशा…! ८
ग्रंथ बीजक प्रसिद्ध
कबीरांची शब्दावली
जीवनाचे तत्त्वज्ञान
प्रेममय ग्रंथावली…! ९
नाथ संप्रदाय आणि
सुफी गीत परंपरा
सत्य अहिंसा पुजा
प्रेम देई नयवरा…! १०
संत कबीर प्रवास
चारीधाम भारतात
काशीमधे कार्यरत
दोहा समाज मनात…! ११
आहे प्रयत्नात मश
मनोमनी रूजविले
कर्ममेळ रामभक्ती
जगा निर्भय ठेविले…! १२
हिंदू मुस्लिम ऐक्याचा
केला नित्य पुरस्कार
साखी सबद रमैनी
सधुक्कडी आविष्कार…! १३
बाबा साहेबांनी केले
संत कबीरांना गुरू
कबीरांचे उपदेश
वाट कल्याणाची सुरू…! १४
काशीतले विणकर
वस्त्र विणले रेशमी
संत कबीर महात्मा
ज्ञान संचय बेगमी…! १५
सुख दुःख केला शेला
हाती चरखा घेऊन
जरतारी रामनाम
दिलें काळीज विणून…! १६
संत्यमार्ग चालण्याची
दिली जनास प्रेरणा
प्रेम वाटा जनलोकी
दिली नवी संकल्पना…! १७
मगहर तीर्थक्षेत्री
झाला जीवनाचा अंत
साधा भोळा विणकर
अलौकिक कवी संत…! १८
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈