मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ धुकं… ☆ मेहबूब जमादार ☆
अशी कशी तू धुक्यात
क्षणी जातेस विरुन
थोडं बघ वाटेकडे
सूर्य जाईल घेऊन
धुक्यांच्या वलयात
तू जातेस लपून
पहाटेच्या थंड दवा
चिंब अंग भिजून
धुक दाट पडलेलं
त्यांन सूर्या धरलेलं
आसुशी भेट धरा
तरी थोडं थांबलेलं
पडू दे विरहाच धुकं
पण तू विरू नकोस
मनवेड्या धुक्यात
आंधळी होऊ नकोस
वनी धुकं मनी धुकं
कसं दिसे डोळ्यांना
आत शिरू दे सूर्याला
फूल येऊ दे कळ्यांना
वृक्ष वल्लरींना कसं
गेलं धुकं लपेटून
घरंगळती कांही मोती
ओल्या पानांपानांतून
हळुहळू उजाडेल
चरी धुक्याचा वावर
थबकली सारी किरणं
पांघरली सूर्यानं चादर
© मेहबूब जमादार
मु -कासमवाडी पो .पे ठ जि .सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈