सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ पळसफुले… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
उन्हाळ्याच्या चाहूलवेळी
वनज्योती अंगी चेतवूनी
त्रिदलपर्णी पळस हा तर
फुलूनी बहरला रानीवनी
लालचुटुक शुकचंचूपरी
शोभती पलाश कलिका
लालकेशरी पळसफुले
उधळती हास्य मौक्तिका
तीव्र उन्हाचा दाह सोसूनी
पळस झळकतो अंगांगी
अग्नीत तापून सुवर्ण जसे
बावनकशी लखलखे सर्वांगी
वर्दळ येथे शत भुंग्यांची
मधु चाखण्या खगही आतुर
फुलाफुलातील रंगासवे
सृष्टीत या रंगोत्सवा बहर
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈