श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 148 – पंढरीची वारी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
आषाढी कार्तिकी
पंढरीची वारी।
नामाचा जल्लोष
करी वारकरी।।
विरालासे दंभ।
नसे भेदभाव ।
भजनात रंगे
रकं आणि राव ।।
श्रद्धेची पताका
खेळती पावली।
टाळ मृदुंगाच्या
तालात चालली ।।
सजले कळस
डोई ही तुळस ।
गाऊया अभंग
सोडूनी आळस ।।
वैष्णवांचा धर्म
नाम संकीर्तन
धरोनी रिंगन
सद्भावे नर्तन ।।
वरी भीमा तीरी
धन्यती नगरी ।।
भक्तांच्या संगती
भुलला पंढरी।।
अनाथाची आई
माझी ग विठाई।
रूसली कौतुके
राई रूख्माबाई।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈