सुश्री सुमन किराणे
कवितेचा उत्सव
☆ कवितांची साथ… ☆ सुश्री सुमन किराणे ☆
दुःखं झुंडीनं घुसली
जीव माझा गुदमरे
त्यांच्या स्वागता मी नेले
दैव फाटके सामोरे
दिली जुन्यारं नेसाया
शिळं पाकं पंगतीला
चंद्रमौळी घरामध्यें
माझे अश्रू दिमतीला
आज घालती धिंगाणा
जाच किती करतील
कंटाळून कधीतरी
आपोआप पळतील
अचानक कवितांनी
मला साथ देऊ केली
काट्या कुट्यांच्या कोंदणी
फुले बहरास आली
केला शब्दांचा वर्षाव
आणि लेखनाचा मारा
दुःखं पळाया लागली
मज सोडून भरारा
कवितांना सांगितलं
माझ्या पाशी रहा बाई
आतां आपण साऱ्यानी
दुःखा थारा द्यायचा नाही.
© सुश्री सुमन किराणे
पत्ता – मु.पो. हेर्ले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर.
मोबा.9850092676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈