श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 186
☆ तुझी गजल… ☆
☆
तुझी गजल तिशीतली मला दिसे विशीतली
उन्हात कोवळ्या पहा चमत्कृती त्वचेतली
☆
चहा बशीत ओतताच थंड होत जाय तो
अधर बशीस टेकता तृषा मिळे बशीतली
☆
जलाशयात नाहत्या सरोजिनीस पाहतो
भिजून चिंब पाकळी शहारते दवातली
☆
कडाडते नभातुनी प्रचंड वेगवान ती
भिती भुईस वाटते तिलोत्तमा नभातली
☆
फडात खेळ चालतो तसाच चालतो घरी
बतावणीच ऐकतो घरी तिच्या मुखातली
☆
हळूच हात दाबला तरी रुतेल बांगडी
अजूनही नवीन होय काकणे चुड्यातली
☆
तुझा वसंत रोजचा नव्या रुपात पाहुनी
फुले प्रसन्न हासती उन्हातही वनातली
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈